Ad will apear here
Next
गजरा
"सौमित्र, अरे रात्रीचे अकरा वाजलेत, तुझी आई परत घरात दिसत नाही आहे रे.." नानांच्या त्या हाकेने सौमित्र एकदम आपल्या खोलीतुन बाहेर आला,तसे नानांनी त्याला जवळ घेऊन आई घरात कुठेच दिसत नसल्याचे सांगितले. त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकुन पाठोपाठ मेघापण बाहेर आली,तीच्या चेहरयावर थोडे त्रासिक भाव दिसले पण त्याकडे दुर्लक्ष करुन नानासाहेब व सौमित्र सुमतीताईंना शोधायला बाहेर पडले.इतक्या रात्री कुठे गेली असेल? कोणाला विचारणार? तसे करणे बरेही वाटत नव्हते.दोघेही आपापल्या विचारांच्या तंद्रीत चालत चालत घराजवळ असलेल्या गणपतीच्या मंदीराजवळ आले तर त्यांना त्या मंदीराच्या पायरीवर एकट्याच बसलेल्या सुमतीताई दिसल्या, त्यासरशी सौमित्र झपझप चालत त्यांच्याजवळ जाऊन जवळपास ओरडलाच, " आई, काय हे? का अशी त्रास देते? न सांगताच कशी काय निघुन येऊ शकते तु आणि तेही इतक्या रात्री? अग नानांकडे पहा कीती घाबरले आहेत ते? इतक्यात तुझ अस विचित्र वागण फार वाढत चाललय,काय म्हणाव तुला?"दुरुन नानासाहेब हे सगळं पहात होते, त्यांना सौमित्रचा त्रागा समजत होता, पण सुमतीच्या अशा वागण्याने ते मनोमन काळजीत पडले होते, सौमित्रचा आवाज ऐकुन सुमतीताईंनी निर्विकार चेहरयाने त्याच्याकडे पाहीले व त्याच्यासोबत त्या मुकाट चालु लागल्या. इतक्यात सुमतीताई अधुन मधुन अशाच विचित्र वागायला लागल्या होत्या, दिवसातुन कधीकधी दोन तीन वेळा आंघोळ करायच्या, कुठेतरी वस्तु ठेवुन द्यायच्या आणि मग आठवल्या नाहीत की दिवसभर ते शोधण्याच्या नादात घरभर पसारा काढुन ठेवायच्या, एकदा तर नानासाहेबांसोबत बाजारात भाजी आणायला गेल्या असतांना आपला भाऊ वसंता समजुन तो घरी का आला नाही म्हणुन एका भलत्याच माणसाला फैलावर घेतले होते,त्या माणसाची समजुत घालता घालता नानासाहेब चांगलेच वैतागले होते आणि चार लोकात सुमतीताईंनी तमाशा केल्यामुळे खजिलही झाले होते, बर , तेव्हा सुमतीताई काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या," तो वसंताच आहे, माझ्यापासुन तोंड लपवत का फिरतो आहे," म्हणुन रडायलादेखील लागल्या होत्या,कसबस समजावुन नानासाहेबांनी त्यांना घरी आणल होत, त्यानंतरही त्यांच वागणे सामान्य नव्हतच, याआधीपण त्या अशाच त्यांच्या मनात आले तेव्हा कोणालाही न सांगता घरुन निघुन गेल्या होत्या, नानासाहेब आपल्याच विचारांच्या तंद्रीत घरी आले, सौमित्र सुमतीताईंना त्यांच्या खोलीत झोपवुन आल्यावर नानासाहेबांना म्हणाला," नाना, मला आईचे वागणे काही सामान्य वाटत नाही, हल्ली ती जरा विचित्रच वागते,आपण उद्या तिला डाॅक्टरकडे घेऊन जाऊयात." नानासाहेबांनाही त्याचे बोलणे योग्य वाटले म्हणुन त्यांनी मान हलवुन मुकसंमती दर्शवली आणि ते झोपायला गेले.बेडवर सुमतीताई आपल्या हातात मोगरयाचा गजरा घेऊन शांत झोपल्या होत्या. दुसरया दिवशी सुमतीताई नेहमीप्रमाणे नाॅर्मल होत्या, सकाळी उठून आपली नेहमीची कामे आटोपुन त्या बाहेर देवासाठी फुले तोडत होत्या, सोबत सौमित्रची लहानगी स्वरुपापण आजीच्या मागे मागे पारीजातकाची फुले वेचत होती,काल जणु काही घडलच नाही अशा त्या वावरत होत्या, नानासाहेबांनी जेव्हा त्यांना येऊन सांगितले की आपल्याला डाॅक्टरकडे जायचे आहे तशा त्या खुदकन हसल्या आणि "मला मेलीला काय झाले आहे कशाला तुम्ही इतकी काळजी करता आहात?"म्हणुन हसत सुटल्या. नानासाहेब त्यांना आठवण द्यायचा प्रयत्न करत होते पण त्यांना रात्री काय घडले ते काहीच आठवत नव्हते.जेव्हा नानासाहेबांनी स्वतःच्या तब्येतीचे कारण सांगितले तेव्हा मात्र त्या चटकन डाॅक्टरकडे जाण्यास तयार झाल्या.डाॅक्टरकडे जाऊन सगळया तपासण्या आटोपल्यावर डाॅ.नी सौमित्र आणि नानासाहेबांना आपल्या केबिनमधे बोलावुन घेतले. सौमित्र आणि नानासाहेब आल्यावर डाॅक्टर बोलते झाले,ते म्हणाले, "नानासाहेब, सौमित्र, सुमतीवहीनींची प्राथमिक चाचणी केल्यानंतर माझा व माझ्या सहकारी डाॅक्टरांचा निष्कर्ष असा आहे की त्यांच्यात "स्मृतिभ्रंश" अर्थात "अल्झायमरची" लक्षणे दिसत आहेत, हा रोग सहसा पुर्णपणे बरा होत नाही पण इलाज जर लवकर चालु केला तर याने भविष्यात उद्भवणारा त्रास कमी होऊ शकतो, मुख्य म्हणजे रुग्ण तसा शारीरीक दृष्ट्या एकदम ठीक असल्यामुळे हाॅस्पिटलाईज करता येत नाही, तुम्हाला घरीच अशा रुग्णांची शारीरीक आणि मानसिक काळजी घ्यावी लागते. अशा परीस्थितीत रुग्णाचे स्वतःच्या शरीरावर व मनावर नियंत्रण रहात नाही, त्यांना नैसर्गिक विधींचे भान रहात नाही, मेंदुवर ताबा नसल्यामुळे अशा व्यक्ती कशाही वागु शकतात, तुम्हाला त्यांना अगदी लहान मुलासारखे जपावे लागणार आहे, कधीकधी त्या तुम्हाला देखील ओळखणार नाहीत,स्वतःची स्वच्छता , खाणिपिणे,काळाचे भान इ.गोष्टी समजणार नाहीत, दिवस व रात्रीतला फरक कळणार नाही तेव्हा औषधांपेक्षा त्यांना मानसिक आधाराची जास्त गरज भासते जे फक्त जवळचेच लोक करु शकतात.पण नियमीत औषधोपचार व योगा, प्राणायाम करवुन घेतले तर बरयाच अंशी याची तीव्रता कमी करता येते," डाॅक्टरांचे ते बोलणे ऐकुन सौमित्र व नानासाहेब दोघेही हादरुन गेले.डाॅक्टर पुढे म्हणाले की," त्यांना हे समजु देऊ नका आणि घरातील व आजुबाजुच्या लोकांना समजावुन सांगा की त्यांच्या कोणत्याही कृत्याचे वाईट वाटुन घेऊ नका, त्यांची त्यांच्या वागण्या बोलण्यावरुन खिल्ली उडवुन त्यांना हिणवु नका, त्या दुखावतील अस काही करु नका कारण त्या आता सामान्य नाहीत,आपण उपचार सुरु करुच पण मला त्यांना बर करण्यात तुमची खुप मदत लागणार आहे," नानासाहेब तर ते सगळं ऐकुन खचलेच पण सौमित्रने त्यांना धीर दिला, बाहेर सुमतीताई मात्र आपल्याच विश्वात रममाण झाल्या होत्या. सुमतीताईंना घेऊन नानासाहेब व सौमित्र घरी आले, मेघाला सर्व परीस्थिती समजावून सांगितली, ती घरी असल्याने तीला सुमतीताईंकडे जास्त लक्ष द्यावे लागणार होते, तीचा दोन मुलांचा सांभाळ करण्यातच दिवस जात होता व आता एका नवीन जबाबदारीला तीला तोंड द्यावे लागणार होते, तीच्या संसारात सुमतीताईंच्या रुपाने अजुन एका " बाळाची" भर पडली होती.जरा चिडुनच मेघाने सुमतीताईंना त्यांच्या खोलीत नेल.नानासाहेबांना ते लक्षात आल पण ते काही बोलले नाहीत कारण त्यांना आता आपल्या बायकोची काळजी जास्त वाटत होती आणि त्याचमुळे त्यांनी आता आपले सर्व लक्ष सुमतीताईंवर केंद्रीत केले होते.सुमतीताईंनी नानासाहेबांना प्रत्येक समयी साथ केली होती, आपली आवड निवड बाजुला ठेऊन त्यांनी आपल्या घराला, मुलाबाळांना, नानासाहेबांना रुचतील त्याच सवयी स्वतःला लावुन घेतल्या होत्या.आपल्या प्रेमळ व लाघवी स्वभावाने त्यांनी सासर व माहेर दोन्ही घरच्या लोकांना जिंकुन घेतलं होत.नानासाहेब भुतकाळात रमले होते. नानासाहेब म्हणजे श्रीधर कुलकर्णी सरकारी उच्चपदस्थ अधिकारी होते.खानदानी श्रीमंत होते तरीही स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्यांची इच्छा होती आणि त्यात गैर असे काहीच नव्हते. सुमतीचे स्थळ जेव्हा सांगुन आले तेव्हा खर तर ते पहीले लग्नासाठी तयार नव्हते पण जेव्हा सुमतीताईंचा ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो त्यांना दाखवला गेला तेव्हाच त्यांना सुमती आवडली होती, रीतसर मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम जेव्हा झाला तेव्हा सुमतीचे रुप पाहुन नानासाहेबांनी म्हणजेच श्रीधराने लगेच होकार कळवला होता,तीच्यात नाकारण्यासारखे काहीच नव्हते. लांबसडक काळेभोर केस, गोरा रंग, रेखीव नाक डोळे, असलेली सुमती पहील्या नजरेतच सगळयांच्या पसंतीस उतरली,शिवाय ती एम.ए.मराठी आणि संगीत विशारदही झालेली होती.उत्तम संस्कारी, गुणवान अशी सुमती दुधात साखर विरघळावी तशी श्रीधरच्या घरात सामावुन गेली.कुलकर्ण्यांच्या घरात आल्यावर तीने त्यांच्या घरातील सणवार,कुळाचार सगळं सगळं आत्मसात केल.नानासाहेबावर तीचे निस्सीम,निस्वार्थ प्रेम होते, त्यांच्या शब्दाबाहेर ती कधीच गेली नव्हती.नानासाहेबांची नौकरी बदलीची असल्याने तीचा नवीन नवीन लोकांशी संपर्क येत असे, पण जीथे जाईल तीथे सुमती आपली छाप उमटवत असे.तीला खर तर गाण्याची आणि लेखनाची खुप आवड होती,पण लग्नानंतर एकाच वर्षाने सौमित्र झाला आणि त्यानंतर तीनच वर्षात सुपर्णा .त्यामुळे मुलांना मोठे करण्यात, त्यांच्या आवडी निवडी जपण्यात त्यांना आपले छंद बाजुला ठेवावे लागले.लग्नानंतर तीला रेडीओवर आपला शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली होती पण सासरेबुवांनी त्याबाबत खडे बोल सुनावले होते, "आपल घराण गवैयाचे नाही.गाण,बजावण घरापुरतेच मर्यादित ठेवा सुनबाई" त्यामुळे तीच्या प्रगतीला पहीली खिळ तीथेच ठोकल्या गेली होती.मुल मोठी झाल्यावर सुमतीने आपली आवड जोपासण्याचा प्रयत्न केला होता,पण ," ए आई, ते शास्त्रीय संगीत ऐकवुन आमची झोपमोड नको करत जाऊ, उगाच काहीतरी गात बसतेस, आम्हाला बोअर नको करत जाऊस," असले मुलांचे बोल तीला सारखे ऐकावे लागायचे, एकदा ती रविवारी आपली हार्मोनियम घेऊन आपला आवडता राग "अल्हेया बिलावल "गात होती तर श्रीधर म्हणजे नानासाहेबच तीच्या अंगावर केव्हढ्याने तरी ओरडले होते त्यांच्या कामात व्यत्यय आला होता म्हणुन, तीने तशीच पेटी जी अडगळीत टाकली होती ती आजपर्यंत वर काढली नव्हती, लेखनासाठीपण तीला अशीच हेटाळणी सहन करावी लागली होती, त्यामुळे तीची डायरीपण कुठेतरी धुळ खात पडली होती.नंतर तीने सकाळचे अभंग म्हणणेसुद्धा सोडुन दिले होते.हळुहळु तीने आपल्या सर्वच आवडी निवडींवर निर्बंध आणले, पण याने तीचे मुलांवरचे आणि नानासाहेबांवरचे प्रेम कधीच दुभंगले नव्हते. नानासाहेबही सुमतीताईंवर खुप प्रेम करत होते पण त्यांना ते शब्दात कधीच व्यक्त करता आले नाही.ते ऑफीसमधुन येतांना सुमतीसाठी रोज दोन मोगरयाचे गजरे मात्र आठवणीने आणत असत,आपल्या लांबसडक केसांमधे तो गजरा सुमतीने माळला की नानासाहेब खुश होत असत.सकाळीपण ऑफीसला निघायच्या वेळेस जेव्हा सुमती सुस्नात होऊन केसांमधे गजरा माळुन त्यांना निरोप द्यायला उभी रहायची तेव्हा तीचे ते रुप पाहुन त्यांना ऑफीसला जाऊच नये असे वाटायचे.सुमतीने याच कारणासाठी जेव्हा स्वतःचे घर बांधले तेव्हा आपल्या अंगणात मोगरा, जाई_जुई,चमेली,गुलाब, अबोली,कुंदा अशी फुलझाडे मुद्दाम लाऊन घेतली होती.त्यामुळे देवालाही फुले मिळायची व गजरयाची हौसपण भागायची. पण जसाजसा संसाराचा व्याप वाढत गेला तशातशा या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी मागे पडल्या, तीथे भावनीक गुंता मागे पडला व व्यावहारीकपणा मोठा झाला.नानासाहेबांकडे या असल्या शुल्लक गोष्टींकरता नंतर वेळ नसायचा,पण सुमतीताई मात्र नानासाहेबांनी गजरा आणण्याची वाट पहात रहायच्या, नाही काही तर घरीच केलेला गजरा मुद्दाम नानासाहेबांची नजर पडेल अशा जागी ठेवायच्या जेणेकरुन त्यांना सुमतीताईंच्या केसात गजरा माळण्याची आठवण राहील,पण कसल काय? नानासाहेब आपल्या कामात, आपल्या मित्रांच्या गराड्यात आणि नौकरीत सतत मिळणारया मान सन्मानात आणि बढतीमधे गुंतुन गेले होते,कधीतरी सुमतीने त्यांना याबाबत छेडले तर ते" तु काय लहान आहेस का?अजुनही वीशीतली तरुणी समजते की काय स्वतःला?" अस म्हणुन तीच्या सगळया गोष्टी हसण्यावारी न्यायचे, त्यांना आता हे सगळे प्रकार खुळचट वाटायचे. यामधे तीची तुलना कधीकधी नौकरी करणारया आधुनिक राहणीमान,आधुनिक विचार असणारया बायकांशी केली जायची.अधेमधे नानासाहेबांचा "मेल इगो"देखील डोक वर काढायचा, यामुळे तीच्या मनात न्यूनगंड तयार व्हायला लागला होता. मुल मोठी झाल्यावर ती आपापल्या व्यापात गुंतुन गेली, घरामधे सुमतीताईंशी बोलायला कोणालाच वेळ नव्हता.त्यांच्या लेखी सुमतीताई म्हणजे काहीच नव्हत्या, तीने चारचौघींसारखा संसार करावा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, त्यांची अपेक्षा पुर्ती करावी, पै पाहुण्यांची सरबराई करावी या सगळ्या गोष्टी त्यांनी न बोलता एका आदर्श गृहीणीचे कर्तव्य असत म्हणुन कराव्यात हे नानासाहेबांसकट सगळयांनाच अपेक्षित होत.ती प्रत्येक बाबतीत गृहीत धरल्या जाऊ लागली. हळुहळु ती अबोल होत गेली.देवपुजेत, वाचनात, घरातील पसारे आवरण्यात आपला फावला वेळ घालवु लागली,पण नंतर हळव्या झालेल्या सुमतीने आपल्या आवडी निवडी कधीच बाहेर येउ दिल्या नाहीत, ती आपल्या कुटुंबाच्या सुखातच आपले सुख मानत गेली.आपल्या वैयक्तिक जीवनात तीने तीला आवडणारी रागदरी परत कधीच आळवली नाही.नाजुक मनाची सुमती काळाच्या ओघात परत स्वतःला सावरुच शकली नाही, वरुन जरी ती सामान्य वाटत असली तरी आतुन निराशा, वैफल्याने, कोंडमारयाने कोरडी होत गेली. संध्याकाळ झाली तरी नानासाहेब अजुनही हाॅलमधे खुर्चीवरच बसुन होते, सुमतीच्या या अवस्थेला ते स्वतःला जबाबदार मानत होते, त्यांच्या लाडक्या सुमतीला त्यांना या अवस्थेत पाहवल्या जाणार नव्हते.त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.मनाशी काहीतरी निर्धार करुन ते उठले व बाहेर बगिच्यात आले,सुमतीनेच लावलेली झाडे फुलांच्या भाराने वाकली होती,त्यातील मोगरयाच्या काही कळ्या त्यांनी काढुन आपल्या ओंजळीत घेतल्या व ते सुमतीताईंच्या खोलीत आले,त्या कळ्यांना त्यांनी सुमतीताईंच्या उशाशी ठेवले व ते सुमतीताईंच्या उठण्याची वाट पाहु लागले.अर्ध्या तासाने सुमतीताई उठल्या त्या मोगरयाचा सुवास आला म्हणुनच.त्यांना आपल्या उशाशी ती मोगरयाची फुल दिसताच त्या आनंदल्या," अहो, आले का तुम्ही ऑफीसमधुन? मला उठवायचे तरी, आणि काय हो आज सुटीच फुल आणलीत का? गजरा नाही मिळाला का?" अस बोलुन हातात ती फुले घेऊन त्या पटकन बाहेर आल्या.त्यांना त्या अवस्थेत पाहुन नानासाहेबांना गलबलुन आले,ते म्हणाले," अग, आज ती गजरेवाली बाईच दीसली नाही बघ म्हणुन मी सुटीच फुल घेउन आलो, " " काही हरकत नाही, मी करेन हो गजरा, तुम्हाला आवडतो ना मी गजरा माळलेला, आत्ता करते बघा," अस म्हणुन त्या पटकन आरशासमोर बसल्या, आपल्या लांबसडक केसांचा मस्त आंबाडा घालुन त्यांनी त्या फुलांचा गजरा केसांमधे माळलादेखील.आज एका छोट्याश्या कृतीने करामत केली होती, आपण जर अस रोज तीच्याशी वागलो तर आपल्या सुमतीला आपण परत पुर्वीच्या अवस्थेत आणु शकु असा विश्वास त्यावेळेस नानासाहेबांना वाटला खरा पण हा विश्वास थोड्याच वेळात डगमगला.एखाद तासाने सुमतीताई नानासाहेबांना ओळखेनाशा झाल्या, त्यांची स्मृती परत गेली होती,घरातल्या कोणालाच त्या ओळखत नव्हत्या.पण नानासाहेबांनी आशा सोडली नव्हती. दुसरया दिवशी सकाळी त्यांनी परत जुईचा गजरा मेघाकडुन करवुन घेतला, पंडित जसराजजींची अल्हैया बिलावल रागदरी असलेली ऑडीओ रेकाॅर्डींग लावली, शुन्यात पहात बसलेल्या सुमतीताई ती रेकाॅर्डींग ऐकुन थोड्या भानावर येत म्हणाल्या," कीती सुंदर रागदरी आहे, कोण गात आहे बरं?" तेवढ्यात नानासाहेबांनी जुईचा गजरा त्यांच्यासमोर धरला," अगबाई, गजरा? अहो तुम्ही केव्हा आलात? मोगरा नाही मिळाला का आज?" नानासाहेबांना ते ऐकुन थोडा दिलासा मिळाला खरा, पण सुमतीताई हे सगळं आपल्याच धुंदीत बोलत होत्या, पण गजरा अजुनही त्यांच्या विस्मरणात गेला नव्हता ही एक जमेची बाजु होती, नानासाहेबांवरच्या अतुट प्रेमाची ती ग्वाही होती.त्या दोघांची एकमेकांना कीती गरज होती हे एव्हाना सौमित्र आणि मेघाच्याही लक्षात आले होते, मग त्यांनीपण सुमतीताईंची स्मृती परत आणण्याकरता माळावरची धुळ खात पडलेली हार्मोनियम खाली काढली, तीचे सुर नीट करवुन आणले, नवीन आणता आली असती पण ती सुमतीताईंच्या स्मरणातील पेटी असल्यामुळे तीला पाहुन कदाचित त्यांच्या आठवणी चाळवल्या गेल्या असत्या म्हणुन तीच राहु दीली.स्वरुपाने आजीची अडगळीत पडलेली जुनी डायरी शोधुन काढली आज तीपण आजीला आपल्या जगात परत आणण्याचा प्रयत्न करणार होती.त्यांच्या छोट्या छोट्या आवडी निवडी आठवुन त्यांना विस्मृतीच्या भयाण जगातुन बाहेर काढण्याचा त्या चौघांनी चंगच बांधला होता.पण सुमतीताई दिवसेंदिवस अजुन भ्रमात चालल्या होत्या, रात्री केव्हाही उठुन देवपुजा करायच्या, गेटला लाॅक असले तर मोठमोठ्याने सौमित्रला हाका मारायच्या, सकाळी रात्र समजुन सगळया घरातील दिवे लावुन ठेवायच्या, भलत्याच वेळी भाजी आणायला जायचे म्हणुन हट्ट करायच्या तर कधीकधी मेघासोबत स्वयंपाक करु दे म्हणुन हट्ट धरायच्या.तर कधीकधी शुन्यात एकटक पहात बसायच्या, घरात आहे की बाहेर तेदेखील त्यांना कळायचे नाही, अंगावरचे कपडेपण घालायचे भान आताशा त्यांना रहात नव्हते, मेघाला हे सर्व करतांना तारेवरची कसरत करावी लागत होती, मदतीला नानासाहेब आणि सौमित्र असायचे पण कधीकधी सगळयांचाच संयम सुटायचा.पण एवढ्या सगळ्या गडबडीत गजरा मात्र कायम त्यांच्या स्मरणात होता.त्या एका उमेदीवरच नानासाहेब रोज आठवणीने घरची फुले मिळाली नाही तर बाहेरुन गजरा विकत आणायचे.डाॅक्टरांनाही या गोष्टीच आश्चर्य वाटायच. एक दिवस सकाळी सकाळी नानासाहेबांच्या कानावर पेटीचे सुर पडले म्हणुन ते तडक उठुन हाॅलमधे आले तर सुमतीताई पेटी वाजवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होत्या.ते बेसुर सुर ऐकुन सौमित्र व मेघापण बाहेर आले पण सुमतीताई आपल्याच नादात काहीतरी वेडवाकड वाजवत होत्या, आता त्यांच्या अशा तर्हेवाईक वागण्याला घरातील सगळेच सरावले होते,अशा वेळी त्यांना आटोक्यात आणाण्याचे काम गजरा चपखलपणे करायचा,गजरा दिसला की त्या शांत व्हायच्या, गजरयाची ती फुले आणि सुवास एकाच धाग्यात बांधलेली असल्यामुळे सुमतीताईंची स्मृती त्या गजरयासारखीच गंधीत होऊन थोड्या वेळाकरता परत येत होती व गजरयातील फुले जशी सुकायची तशी त्यांची स्मृतीदेखील पुसट होत असे.कधीकधी त्या भानावर असतांना आपल्याला असलेल्या आजारामुळे बाकीच्यांना कीती त्रास होतो हे त्यांना कळायच तेव्हा त्यांना खुप वाईट वाटायचे,आपल्या बेताल वागण्याने त्या खजिल व्हायच्या पण विस्मरण झाले की परत तीच अवस्था व्हायची.सगळेच तसे कंटाळले होते पण नानासाहेबांची त्यांना बरी करण्याची जिद्द पाहीली की सगळे परत नव्या जोमाने कामाला लागायचे.अशीच तीन चार वर्ष निघुन गेली.इतक्या वर्षात त्या घराला विसर पडलेला गजरा मात्र रोज आपल्या सुगंधाने त्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचे काम बिनबोभाट करत होता. एकदा मात्र कहर झाला, त्यादिवशी दुपारी सगळे आराम करत असतांना सुमतीताई अचानक घरुन निघुन गेल्या, त्या निघुन गेल्यावर अर्ध्या पाऊण तासाने त्या घरात नाही पाहुन सगळेच घाबरले.सगळीकडे शोधाशोध चालु झाली पण त्या काही सापडेना.जवळच्या नातेवाईकांना फोन करुन झाले, नानासाहेबांच्या, सौमित्रच्या मित्रांना विचारल्या गेले पण सुमतीताईंचा काहीच पत्ता लागत नव्हता, शेवटचा उपाय म्हणुन पोलीसात तक्रार द्यायची ठरले तेवढ्यात त्यांच्याच एरीयात राहणारया माणसाने सुमतीताईंना आपल्या गाडीतुन घरी आणले, त्या रस्त्यावर सिग्नलच्या मधोमध भांबावलेल्या अवस्थेत उभ्या होत्या असे त्याने सांगितले, त्यांच्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता, लोक ओरडत होते, बर त्यांना काहीच आठवत नसल्यामुळे पोलीसांनी त्यांना नेऊन पोलीस स्टेशनला बसवले होते, हे सर्व त्या माणसाने पाहीले व बाई ओळखीची वाटल्यामुळे त्यांच्या मागे जाऊन, पोलीसांशी बोलुन तो सुमतीताईंना आपल्यासोबत घेऊन आला होता.आता सुमतीताईंच्या वागण्याची हद्द झाली होती, आज इतक्या दिवसांनी नानासाहेबांच्या "मेल इगो "ने डोकं वर काढले होते.नानासाहेबांनी काही न बोलता त्या दिवसापासून त्यांना खोलीत बंद करुन ठेवले होते.त्यांना सुमतीताईंचे हाल पाहवल्या जात नव्हते, एका निर्णयाशी येऊन ते थांबले होते,त्या दिवसापासून त्यांनी सुमतीताईंसाठी गजरा आणणे बंद केले, त्यांना या गोष्टीचा खुप क्लेश झाला पण इतरांच्या सुखाकरता त्यांनी स्वतःला कठोर केले, सुमतीची त्या गजरयाशी असलेली स्मृती त्यांनी विस्मरणात टाकली होती, तीचे धागेदोरे कापले होते.त्यांच्या अशा वागण्याने घरचे लोकही भांबावले होते, पण या वेळेस नानासाहेबांनी कोणाचेच ऐकले नव्हते, त्या बंद खोलीत सुमतीताई कीतीतरी काळ तशाच घालवायच्या,एकट्याच असल्याने स्वतःशीच बोलत रहायच्या, गजरा आणला नाही म्हणुन खंत व्यक्त करायच्या,हळुहळु त्यांची प्रकृती ढासळत होती, म्हणायला सौमित्र त्यांना खोलीच्या बाहेर काढुन थोड बाहेर बगिच्यात फिरवायचा पण त्या आता परत अबोल झाल्या होत्या.एक दिवस सौमित्रसोबत बाहेर फिरत असतांना, "मला कोणीतरी बोलावते आहे, माझा गजरा कुठे आहे, मला तयार व्हायचे आहे ",अशा काहीतरी त्या आपल्याशीच बरळत होत्या, ते नानासाहेबांनी ऐकले व त्यांना गहीवरुन आले, झाली तेवढी शिक्षा पुरे म्हणुन त्यांनी त्या दिवसापासून सुमतीताईंसाठी गजरा आणणे सुरु केले, त्या दिवशी गजरा दिसल्याबरोबर सुमतीताईंचा चेहरा फुलला.त्यांनी तो लगेच केसात माळला.असे सात आठ दिवस गेले, एक दिवस नानासाहेब झोपेतुन जरा उशीरा उठले, आज सुमतीच्या खोलीत त्यांना काही हालचाल दिसली नाही पण झोपली असेल म्हणुन तिकडे न जाता त्यांनी आपले स्वतःचे नित्यकर्म आटोपले व ते आदल्या दिवशी आणलेल्या दोन गजरयांपैकी उरलेला एक गजरा घेऊन सुमतीताईंच्या खोलीत गेले तर सुमतीताई हातात आदल्या दिवशीचा गजरा घेऊन शांत झोपलेल्या त्यांना दिसल्या, आवाज देऊनही त्यांची काहीच हालचाल न दिसल्याने नानासाहेबांनी बेचैनीने त्यांना हलवले तर सुकलेला गजरा सुमतीताईंच्या हातातुन खाली निसटला, नानासाहेब काय समजायचे ते समजले.सुमतीताई नानासाहेबांच्या त्या गजरारुपी प्रेमाच्या आठवणी कायमच्या आपल्यासोबत घेऊन गेल्या होत्या, स्वतः विस्मरणात जाऊन आपल्या कुटुंबाच्या स्मृती त्यांनी त्या गजरयाच्या साक्षीने सगळयांच्या मनःपटलावर कायमच्या कोरल्या होत्या, त्या गेल्या तरी विविध गजरयांच्या रुपाने कायम स्मरणात राहील्या होत्या,त्या गजरयाने त्या घरातील लोकांना जीवनावर भरभरून प्रेम कसे करावे ते शिकवले होतै, एक छोटीशी आठवण नवरा बायकोचे सहजीवन कसे समृद्ध करु शकते हे तो गजरा आपल्या अबोल अस्तित्वातुन सांगुन गेला होता. पण फार उशीराने या गोष्टी नानासाहेब, सौमित्र व मेघाच्या लक्षात आल्या होत्या.नानासाहेब सुमतीताईंच्या निष्प्राण देहाजवळ हातात ताजा मोगरयाचा गजरा घेऊन सुमतीताईंच्या उठण्याची वेडी आशा बाळगून उभे होते.तो गजरा निश्चितच काहीतरी चमत्कार करेल असे त्यांना वाटत होते.एकटक ते सुमतीताईंच्या चेहरयाकडे पहात होते, सुमतीताई गेल्या तरी त्यांचा चेहरा प्रसन्न दिसत होता, एका हाताशी खाली सुकलेला गजरा पडला होता.विस्मृतीमधेही त्या गजरयाने त्यांच्या मनाला उभारी देण्याचे काम केले होते, त्यांच्या काही आठवणी त्या गजरयाने कायम सुगंधीत करुन ठेवल्या होत्या.त्या गेल्या त्या दिवशी अंगणातील सगळीच फुलझाडे फुलांनी बहरली होती,सुमतीताईंच्या शेवटच्या प्रवासात ती फुले गजरा होऊन त्यांच्यासोबत जाण्यास तयार होती.आपल्या शरीराचा गजरा करुन ती फुले जणु सुमतीताईंना त्यांच्या कुटुंबातील लोकांना तुमचा कधीच विसर पडु देणार नाही हा विश्वास देत होती. आपल्या अंगीभुत असलेल्या सुवासाने त्यादिवशी सगळे वातावरण त्या फुलांनी भारुन टाकले होते.कोपरयावरची गजरे विकणारी बाईपण अंगणात उभी राहुन सुमतीताईंसाठी हातात मोगरयाचे गजरे घेऊन उभी होती.रोज गजरयाचा हट्ट धरणारी सुमती अनंतात विलीन झाली होती हे तीच्या ध्यानीमनी ही नव्हते पण तीच्या हातातील गजरयाला ते माहीत असावे म्हणुन ते गजरे कधीही घरी न येणारया बाईला घेऊन सुमतीताईंची शेवटची भेट घेण्याकरता आले असावे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CWIHCR
Similar Posts
लॉकडाउनमध्ये मोडी लिपी शिका ऑनलाइन.. तेही मोफत..! करोना विषाणूमुळे ओढवलेल्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांच्या हातात भरपूर वेळ निर्माण झाला. प्रत्येकाने आपापल्या परीने त्या वेळाचा सदुपयोग करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. काही जण वेगवेगळे ऑनलाइन कोर्सही करत आहेत. अशाच पद्धतीने घरबसल्या मोडी लिपी शिकण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे
पॅटन सैनिकांमध्ये स्फूर्ती आणि चेतना निर्माण करणारं बेधडक आणि घणाघाती भाषण करणाऱ्या आणि तितक्याच बेधडकपणे शत्रूशी लढणाऱ्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्या अमेरिकेच्या जनरल पॅटनवरची फिल्म म्हणजे ‘पॅटन.’ आजच्या ‘सिनेसफर’मध्ये त्या फिल्मविषयी...
बोलू ‘बोली’चे बोल! - झाडी बोली, गोंडी बोली (व्हिडिओ) २०१९ या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. लॉकडाउनच्या काळात वेळ हाताशी असताना रसिकांना बोलीभाषांचा गोडवा अनुभवता यावा, म्हणून बोलीभाषांच्या व्हिडिओची मालिका पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. त्या मालिकेत
युद्धस्य कथा रम्या...! तसं पाहायला गेलं, तर अनेकांचे जीव घेणारी, अनेक कुटुंबं उद्ध्वस्त करणारी युद्ध ही गोष्ट कधीही रम्य असू शकत नाही; पण साहसकथा मनुष्याला कायमच आवडतात. त्यामुळे ‘युद्धस्य कथा रम्या’ असं म्हटलं जातं. या पार्श्वभूमीवर, ‘सिनेसफर’ सदराची सुरुवात आपण करणार आहोत ‘वॉरफिल्म्स’ या जॉनरपासून... सुरुवातीला या जॉनरबद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language